प्रियंका गांधींनी घेतली उन्नाव पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

पीडितेच्या सुरक्षेवरून राज्य सरकारला विचारले प्रश्‍न

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनी उन्नावच्या बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. प्रियंका यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी बलात्कार पीडित तरुणीला सुरक्षा का पुरविण्यात आली नव्हती, असा स्वाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणांनी गुरुवारी भर रस्त्यात जिवंत जाळले. यामध्ये ती 90 टक्के भाजली होती. दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूनंतर देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना हैदराबादप्रमाणेच आम्हालाही न्याय द्या, अशी मागणी केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्‌विटरवरून पीडितेला सुरक्षा का पुरवली गेली नाही असा सवाल देखील केला आहे. ‘उन्नावमध्ये याआधी घडलेल्या घटना लक्षात घेऊन पीडितेला सुरक्षा का दिली गेली नाही? तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली? उत्तर प्रदेशमध्ये रोज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. ते रोखण्यासाठी सरकार काय करत आहे?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी ट्‌विटरवरून विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.