नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लवकरच त्या राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मिशन युपीसाठी प्रियांका सज्ज झाल्याचे मानले जात आहे.
प्रियांका 14 जुलैला लखनौला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या नियमितपणे उत्तरप्रदेशच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करतील. लखनौ भेटीआधी प्रियांका यांनी सोमवारी उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली.
त्या बैठकीत महागाई, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्था स्थितीवरून रस्त्यांवर उतरून सत्ताधारी भाजपविरोधात निदर्शने छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर उत्तरप्रदेश ढवळून काढण्याची कॉंग्रेसची रणनीती असल्याचे सूचित झाले.
कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेत चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रियांका यांचा दौरा मोलाचा हातभार लावू शकेल. उत्तरप्रदेश दौऱ्याचा प्रारंभ करण्याआधी प्रियांका यांनी रविवारी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याशी चर्चा केली.
त्यामुळे उत्तरप्रदेश निवडणुकीत बघेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा कॉंग्रेसचा मानस असल्याचे मानले जात आहे. उत्तरप्रदेशात प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारीही कॉंग्रेसने सुरू केली असल्याचे समजते.