नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या प्रचाराला वेग आला आहे. काही ठिकाणी आक्रमक प्रचार पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या नागपूरमधल्या रोड शो दरम्यान तुफान राडा झाला. प्रियांका गांधी यांच्या रोड शो मध्ये भाजपचे कार्यकर्ते घुसल्याने आणि भाजपचे झेंडे नाचवल्याने दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
प्रियांका गांधी कालपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत आहेत. शिर्डी, कोल्हापूरनंतर रविवारी प्रियांका गांधी यांची सभा आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये होती. तत्पूर्वी रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भारत माता की जय… वंदे मातरम अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तसेच त्यांनी भाजप उमेदवारांचे पोस्टरही झळकावले. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.