लखनऊ – आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी वढेरा या पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहण्याची नागरिकांची इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभा निवडणुका लढल्या जातील. जनतेसोबतच उत्तर प्रदेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच कॉंग्रेस स्वबळावर उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा दावाही तिवारी यांनी केला. कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेशातील 403 जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली जाते आहे. राज्यात समाजवादी पक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती. मात्र दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होण्याऐवजी तोटाच झाला.
बिहारमध्येही अन्य पक्षांशी विशेषत: राष्ट्रीय जनता दलाशी केलेली आघाडी ही कॉंग्रेसपेक्षा राजदलाच अधिक हानिकारक ठरली. त्यामुळे कॉंग्रेसला किमान प्रदेश पातळीवर सोबत घेण्यास कोणताही प्रादेशिक पक्ष फारसा उत्सुक नसल्याची आजची तरी स्थिती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात आता स्वबळावरच लढण्याची चाचपणी सुरू केली आहे.