मुंबई – बॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकामुळे खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत “बेस्ट सेलर’ म्हणून जाहीर करण्यात आले. या पुस्तकात प्रियांका चोप्राने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
प्रियांका चोप्राने या बायोग्राफीमध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. तसेच अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्याबाबत माहिती करून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामुळेच प्रियांकाच्या या पुस्तकाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याने बॉलीवूडमधील चाहत्यांनाही ते उपलब्ध होणार आहे.
याबाबत एक पोस्ट करत अभिनेत्रीने संकेत दिले आहेत. प्रियांका चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती एका कागदावर हिंदी भाषेत लिहिताना दिसत आहे. परंतु ही क्लिप शेअर करत तिने कोणताही उल्लेख केलेला नाही. परंतु ती ‘अनफिनिश्ड’च्या हिंदी आवृत्तीकडे इशारा करत असल्याचे प्रतित होते.
प्रियांकाने बॉलीवूड ते हॉलीवूडपर्यत आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.