Priyanka Chopra: बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियंका चोप्रा नेहमीच तिच्या स्टाईल आणि लाइफस्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवते याचा खुलासा केला आणि त्यामुळे चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल एक वेगळाच पैलू पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, तिच्या पर्समध्ये असलेल्या काही वस्तूंमुळे तिचा ‘देसी’ स्वभावही समोर आला आहे. प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या टोट बॅगची झलक दाखवत त्यातल्या वस्तूंबद्दल सांगितलं. रोजच्या वापराच्या वस्तूंसोबतच काही खास आणि वैयक्तिक गोष्टीही ती पर्समध्ये ठेवते. तिने सांगितलं की, तिला अस्थमाचा त्रास असल्यामुळे ती नेहमी इनहेलर सोबत ठेवते. त्याशिवाय परफ्यूम, हेअर स्प्रे, सनग्लासेस आणि आवश्यक कागदपत्रे हेही तिच्या बॅगचा भाग असतात. मात्र, सर्वाधिक चर्चा तिच्या ‘देसी कनेक्शन’बद्दल झाली. प्रियंका सांगते की, ती नेहमी आपल्या पर्समध्ये हनुमान चालीसाचे पुस्तक ठेवते. तिच्या मते, हे तिला मानसिक शांती देतं आणि प्रवासादरम्यान सुरक्षिततेची भावना निर्माण करतं. रोज वाचता येत नसले तरी वेळ मिळाला की ती हनुमान चालीसा वाचते, असं तिने सांगितलं. इतकंच नाही, तर प्रियंका चोप्रा आपल्या पर्समध्ये काळा दोराही ठेवते. भारतीय संस्कृतीत काळा दोरा हा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे ती हा दोरा नेहमी जवळ ठेवते. यामुळे तिचा आपल्या संस्कृतीशी असलेला संबंध स्पष्ट दिसतो. Priyanka Chopra priyanka chopra प्रियंकाच्या पर्समधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचा आणि पती निक जोनस यांचा पहिला फोटो. २०१८ मध्ये काढलेला हा फोटो तिच्यासाठी खूप खास आहे. ती हा फोटो नेहमी आपल्या सोबत ठेवते, कारण त्यात तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण जपलेला आहे. याशिवाय, प्रियंका आपल्या बॅगमध्ये टाइड पेन (डाग काढण्यासाठी वापरलं जाणारं साधन) आणि पोर्टेबल चार्जरही ठेवते. विशेष म्हणजे, चार्जरवर तिने लेबल लावलं आहे, जेणेकरून घरातील इतर कोणी तो वापरू नये. तिच्या या छोट्या-छोट्या सवयी चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. कामाबद्दल बोलायचं झालं, तर प्रियंका चोप्रा लवकरच ‘वाराणसी’ या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एकंदरीत, प्रियंका चोप्राच्या पर्समधील या साध्या पण खास गोष्टींमुळे तिचा जमिनीवर राहणारा स्वभाव आणि आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं पुन्हा एकदा समोर आलं आहे.