बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत चर्चेत असते. आता ती आपल्या नव्या हॉलीवूड चित्रपटाच्या घोषणेमुळे प्रसिध्दिच्या झोतात आहे. प्रियांका चोप्राचा “वी कॅन बी हीरो’चा लवकरच सिक्वल येत आहे. हा चित्रपट गतवर्षी 2020 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
मुलांवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची माहिती खुद्द प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर “वी कॅन बी हीरोज’च्या सिक्वेलशी संबंधित आपला लूक शेअर केला. प्रियांका चोप्राने आपल्या ट्विटमध्ये असाही दावा केला आहे की, “वी कॅन बी हीरोज’ 44 कोटी लोकांनी पाहिला आहे.
या चित्रपटाशी संबंधित आपला लूक शेअर करत प्रियांकाने ट्विट केले की, “हिरोइक्स हेडक्वॉर्टर प्रोजेक्शन ः पहिल्या 4 आठवड्यांत 44 दशलक्ष कुटुंबांनी आम्हाला “वी कॅन बी हीरोज’ला पसंती दर्शविली आहे. आणि ब्रेकिंग न्यूज ः हिरोज दुसऱ्यांदा तुमच्या भेटीला येत आहेत. याचा सिक्वेल येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रियांकाचे हे ट्विट खूपच व्हायरल झाले आहे. प्रियांकाच्या या ट्विटला असंख्य चाहते आणि यूझर्सने पसंती दर्शविली आहे. या चित्रपटात प्रियांका ही सुश्री ग्रेनाडाच्या भूमिकेत दिसणार आहे.