लॉस एंजेलिसमध्ये ब्युटीकॉल इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राबरोबर तिच्या फॅन्सचा वार्तालापाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक महिला अचानक उठली आणि प्रियांकाने मार्चमध्ये केलेल्या एका ट्विटवरून प्रश्न विचारायला लागली. प्रियांकाने त्या ट्विटमध्ये भारतीय लष्करासाठी “जय हिंद’ असे म्हटले होते.
मात्र या पाकिस्तानी महिलेने या ट्विटवर आक्षेप घेतला. प्रियांका युनायटेड नेशन्सची गुडविल ऍम्बेसेडर आहे. मात्र भारतीय लष्करासाठी “जय हिंद’ म्हणून प्रियांका पाकिस्तानमध्ये आण्विक युद्धाला चिथावणी देत आहे, असे ही महिला ओरडून म्हणाली. प्रियांकाने शांतपणे त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतर आपले उत्तर दिले.
मी एक राष्ट्रभक्त आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना जर ही गोष्ट खटकत असेल, तर त्यांनी मला क्षमा करावी. अनेक पाकिस्तानी माझे मित्र आहेत. आपल्या सर्वांना एका “मिडल ग्राऊंड’वर रहावे लागते. ज्या प्रकारे तू आता ओरडते आहेस, असे ओरडून काही होणार नाही. त्यामुळे ओरडू नकोस.
आपण इथे भांडायला आलेलो नाही. प्रेम व्यक्त करायला आणि प्रेम वाढवायला आलो आहोत, हे लक्षात घे. असे प्रियांकाने त्या महिला सुनावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रियांकाने दाखवलेल्या संयमाचे कौतुक व्हायला लागले आहे.