पिंपरी – शाळेच्या महिला क्लार्कने विद्यार्थ्यांकडून शाळेच्या फीचे पैसे घेवून त्याची शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंदही केली. मात्र, त्यानंतर शाळेच्या संगणकामधून सर्व पावत्या डिलीट करून शाळेला तब्बल 8 लाख 91 हजार 797 रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघउकीस आला आहे. ही घटना भोसरी येथील प्रियदर्शनी हायस्कूलमध्ये 2015 ते 2019 या कालावधीत उघडली.
याप्रकरणी, शाळेचे मुख्याध्यापक अमित बापूसाहेब पाटील (वय 40, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिला क्लार्क राजश्री देशमुख (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) विरोधात गुन्हा नोंदवला.
भोसरी येथील दिघी रोड येथे प्रियदर्शनी हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेत राजश्री देशमुख या क्लार्क म्हणून काम करतात. शाळेच्या आर्थिक नोंदी त्यांच्यामार्फत केल्या जातात. देशमुख यांनी सन 2015 ते 14 जून 2019 या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे घेतले. त्याची नोंदही शाळेच्या संगणकात केली.
मात्र, शाळेच्या खतावणी रजिस्टरमध्ये या पैशाची नोंद न करता त्यांनी संगणामध्ये नोंद केलेल्या 1 हजार 355 पावत्या संगणकातून डिलीट केल्या. रजिस्टरमध्येही नोंद नसल्यामुळे शाळेकडे या पावत्याचे कोणतेही रेकॉर्ड राहिले नाही. या पावत्यातून राजश्री यांनी शाळेचे एकूण 8 लाख 91 हजार 797 रुपयांचा अपहार करत शाळेची फसवणूक केली. याबाबत मुख्याध्यापक अमित पाटील यांना संशय आला असता त्यांनी खतावणी व संगणकातील रेकॉर्ड यांची तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.