नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिच्या आई आणि बहिणीचे कोरोना मुळे निधन झाले होते. त्यानंतर क्रिकेटविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू प्रिया पुनिया हिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पूनियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
पूनियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे . ‘तू नेहमी मला खंबीर राहा असे का म्हणायचीस हे आज मला समजले. एके दिवशी मला तुझ्याविना जगावे लागणार आहे, याची तुला कल्पना होती. आई मला तुझी खूप आठवण येत आहे. मी कितीही लांब गेले, तरी तू माझ्यासोबत आहेस याची मला खात्री असायची. आयुष्यात काही सत्य स्वीकारणे फार कठीण असते. तुझ्या आठवणी मी कधीही विसरू शकणार नाही,’ असे पुनियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोरोनामुळे भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फिरकीपटू पियुष चावला, माजी जलद गोलंदाज आरपी सिंह, आयपीएलमधील स्टार युवा जलद गोलंदाज चेतन साकरिया या खेळाडूंच्या वडिलांचे निधन झाले आहे. भारतामध्ये कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन पुनियाने केले. ‘कृपया नियम पाळा मास्क लावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,’ असे पुनियाने म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. संघात प्रियाची निवड करण्यात आली आहे, पण इंग्लंड दौऱ्याच्या आधी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतीय महिला संघातील फलंदाज प्रिया पूनियाने 2019 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत 7 वनडे आणि 3 टी-30 सामने खेळले आहेत.