Pune City | खासगी वाहनांचा शहरावर भार;वायूसह ध्वनिप्रदूषणाचाही धोका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी शहरातील खासगी वाहनांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील हवेतील धोकादायक प्रदूषकांचे प्रमाण वाढतच असल्याचे पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार शहरातील खासगी वाहनांची संख्या तब्बल ४१ लाख २५ हजार ९८६ झाली आहे, तर मागील वर्षी (२०२४-२५) मध्ये ३ लाख ७ हजार ७६० वाहनांची खरेदी झाली आहे. यात सर्वाधिक १ लाख ८७ हजार ६६४ पेट्रोलवर चालणारी वाहने आहेत, तर २९ हजार ६१३ डिझेल वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे केवळ वायू प्रदूषणच नाही, तर वाहतूक कोंडी, अपघात, कर्णकर्कश हाॅर्नमुळे ध्वनिप्रदूषणही वाढले आहे.
पाच वर्षांत दुप्पट वाहन खरेदी
महापालिकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात शहरात सर्वाधिक खासगी वाहनांची नोंदणी झाली आहे. २०२० मध्ये शहरात १ लाख ४६ हजार ९६१ वाहनांची खरेदी झाली होती. २०२१ मध्ये ही संख्या १ लाख ६७ हजार ३२७, सन २०२२ मध्ये २ लाख ५३ हजार ६६३, सन २०२३ मध्ये २ लाख ९२ हजार ३३८ वाहनांची नोंदणी झाली, तर २०२४ मध्ये हा आकडा तीन लाखांच्या वर जात ३ लाख ७ हजार ७६० वाहनांची नोंदणी झाली आहे. २०२५ च्या जूनअखेर आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८९९ वाहनांची नोंदणी झाली आहे. ही आकडेवारी पाहता गेल्या पाच वर्षांत खासगी वाहनांची खरेदी दुपटीने वाढली आहे.
सार्वजनिक वाहतुकीला मिळेना चालना
शहरातील खासगी वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली असतानाच शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी असलेल्या पीएमपीची सेवा मात्र डबघाईस आलेली आहे. मागील वर्षभरात शहरातील रस्त्यांवर सरासरी १७०० बस कार्यरत होत्या. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या सुमारे साडेतीन हजार बसणे आवश्यक असताना हे प्रमाण जवळपास ५० टक्के कमी आहे. त्यातच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रतिदिन सुमारे १० लाखांवरच असल्याने, तसेच वेळेत बससेवा न मिळणे, तसेच प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने नागरिकांकडून खासगी वाहन खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. मेट्रोची सेवा शहरात पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली, तरी पीएमपीचे प्रवासीच मेट्रोकडे वळल्याने खासगी वाहनांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट ही खरेदी वाढतच असल्याचे चित्र आहे.





