खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीला “ब्रेक’

प्रभात वृत्तसेवा
पुणे  – शासन नियमानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस तिकिटापेक्षा दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार खासगी ट्रॅव्हल्सचालकांना आहे. परंतु, यापेक्षा अधिक भाडे न आकारण्याच्या आणि प्रवाशांना योग्य सेवासुविधा देण्याच्या सूचना वाहतूक शाखेकडून दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.

दिवाळीनिमित्त पुणे शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरील शहरांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या कालावधीमध्ये राज्य परिवहन बसेस आणि रेल्वे गाड्या “हाऊसफुल्ल’ असल्याने प्रवाशांना खासगी बसेसचा मार्ग निवडावा लागतो. याचा फायदा घेत खासगी चालकांकडून प्रवाशांची लूट करत मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभाग सतर्क झाला असून या कालावधीत बसेसची तपासणी करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ट्रॅव्हल्सचालकांना सूचना देण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी शनिवारी बैठक घेतली. यावेळी सुमारे 35 ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक, चालक, मॅनेजर आणि बुकिंग एजंटसह येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश साठे, परिवहन कार्यालयाचे मोटार निरीक्षक पंतोजी उपस्थित होते. जादा तिकीट आकारणे, योग्य सुविधा न पुरविणे यासह विविध तक्रारींसाठी वाहतूक पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
साध्या वेशातील कर्मचाऱ्यांकडून कारवाई
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त पंकज देशमुख म्हणाले की, एप्रिल 2018 मधील परिवहन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य परिवहन (एसटी) आकारत असलेल्या तिकीट दरापेक्षा दीडपड जादा भाडे आकारण्याची सवलत खासगी चालकांना दिली जाते. यापेक्षा जादा भाडे आकारल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याबाबत तक्रार आल्यास वाहतूक शाखेच्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.