प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सुमारे 15 ते 20 टीपी स्किम राबविता येऊ शकतात. त्या अनुषंगाने महापालिकेकडून नियोजन सुरू करण्यात आले असून, या गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी याचा फायदा होणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या एकात्मिक विकास आराखड्यात खासगी टीपी स्किम राबविण्याची तरतूद असून, त्यानुसार, 50 एकरपेक्षा जागेत हे शक्य आहे. या तरतुदीचाही वापर करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेने आतापर्यंत केवळ 8 टीपी स्किम केल्या आहेत. त्यानंतर महापालिकेत नवीन समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये नव्याने तीन टीपी स्किम प्रस्तावित केल्या असून, त्यातील दोन योजना राज्य शासनाच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहेत. तर एका योजनेत काही जागा बदल झालेले असून तीही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
या योजनांमध्ये नियोजनाबद्ध कामे होणार असल्याने तसेच भूसंपादनात अडथळा न येता जागा मालकांनाही फायदा होत असल्याने त्या सहज राबविणे शक्य होत आहे. हा पालिकेसाठी चांगला अनुभव असल्याने भविष्यात या नवीन गावांमध्ये असलेली रिकामी जागा पाहता पालिकेस सहज 15 ते 20 टीपी स्किम राबविणे शक्य आहे. त्यामुळे, प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. तर पहिल्यांदाच प्रस्ताव मागवून खासगी टीपी स्कीमही राबविण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यात, जागा मालक एकत्र येऊन 50 एकर पेक्षा अधिक जागा देऊ शकल्यास हे शक्य असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.