पुणे – शहरातील रिकाम्या खासगी मालकीच्या जागा कचऱ्याचे आगार बनले आहेत. या कचऱ्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी तसेच डासोत्पत्ती होत असल्याने परिसरात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडून अशा मिळकतींच्या बाहेर नोटीस लावल्या तरी जागा मालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या पुढे अस्वच्छतेप्रकरणी या जागामालकांवर दंडात्मक कारवाई करून त्याची वसुली मिळकतकरातून करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत चर्चा झाली. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन तयारीत आहे.
महापालिकेकडून दैनंदिन स्वरुपात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात खासगी जागा असून त्या सिमाभिंत बांधून तसेच गेट लावून बंद ठेवल्या आहेत. मात्र, या मिळकतींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असून पाण्याची डबकीही साठलेली आहेत. या जागा खासगी असल्याने पालिकेकडून तेथे स्वच्छता केली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन शहर स्वच्छतेसाठी अशा मालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.