खासगी शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घरोघरी; फीमध्ये सवलत देण्याचे आश्‍वासन

भर उन्हात फिरतात शिक्षक

राहुरी फॅक्‍टरी: राहुरी तालुक्‍यातील कार्यरत असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी चांगली स्पर्धा सुरू झाली आहे. त्यासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी घरोघरी जात असून पालकांना आपली शाळा किती चांगली हे पटवून देवून शाळेचे माहितीपत्रक वाटत फिरत आहेत. त्याबरोबर प्रवेश घेतल्यानंतर फीमध्ये सवलत देण्याचे आमिष देखील दाखविण्यात येत आहे.

या स्पर्धेत सेमी माध्यमातून शाळा सध्यातरी दिसत नाही. या खाजगी शाळेतील शिक्षक व कर्मचारी भर कडक उन्हाळ्यात घरोघरी जावून आमची शाळा इतर शाळेपेक्षा नक्कीच उत्तम शिक्षण देणारी आहे, असे शाळेचे पत्रके वाटुन सांगत आहे.उन्हामुळे विद्यार्थी व पालक घरीच असल्याने शाळेच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या घरी जावून शाळा किती चांगली आहे. हे घरोघरी जावून पटवून देण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार शिक्षक व कर्मचारी घरोघरी जात आहे.

स्पर्धेत टिकून रहाणे महत्वाचे आहे, त्याप्रमाणे मुलांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी या शाळा किती तत्पर असतात. हे फक्त पालकांना माहित आहे. दिवसेंदिवस अशा शाळेच्या फीमध्ये वाढ होताना दिसते. घरापासुन शाळेपर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था केली असते, परंतु काही पालकांना ही बसची फी परवडत नसल्याने स्वतः मुलांना घेवून जाणे पालकांना योग्य वाटते.

शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविण्यासाठी सध्या या शाळांकडून पालकांना विविध अमिषे दाखविण्यात येत आहे. त्यात शालेय गणवेश, शुज, पुस्तके, वह्या हे सर्व दिलेल्या फीमध्येच समाविष्ट करण्यात आले असून विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देखील देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. काहींनी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक वृंद अतिशय उच्च प्रशिक्षित आहे. परंतु त्या शिक्षकांचे प्रमाणपत्र पालकांना दाखविण्यास व अनुभव किती आहे, हे सांगण्यास हरकत घेतली जात आहे. त्यामुळे मुले नक्कीच उच्च प्रतीच्या शाळेत शिक्षण घेतात का? असा प्रश्न पालकांना उपस्थित होत आहे.

सध्या सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच शिक्षण देखील महाग होत चालल्याने गरिबांच्या मुलांना या शाळेत प्रवेश घेतल्यावर योग्य शिक्षण मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काहींना फक्त या शाळेतून व्यवसाय करायचा आहे की काय असाही प्रश्न पालक विचारत आहे. मिनी, ज्युनियर, सिनिअर केजी या गोंडस नावाखाली पैशांचा पाउस पडतो की काय अशीही शंका पालक बोलुन दाखवित आहे.
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक खाजगीत क्‍लासेस घेवून पुन्हा विद्यार्थ्यांना वेगळ्या फीचा भुर्दंड देतात, असेही खुप वेळा समोर आले आहे. काही शिक्षक सांगतात की आम्हाला शाळेतील वेतन परवडत नसल्याने असे खाजगी क्‍लासेस घेवून प्रपंच चालवावा लागतो. त्यामुळे या खासगी शाळांच्या गुणवत्तेबद्दल शंका व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.