नवी दिल्ली : देशांत खासगी रेल्वे 2023 पासून धावू लागतील असे रेल्वे मंत्रालयाने रविवारी पुन्हा स्पष्ट केले. काही प्रसिध्दी माध्यमांत मार्च 2024 पासून खासगी रेल्वे प्रकल्प सुरू होईल अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित होत आहेत.
त्याबाबत रेल्वेने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण रविवारी दिले. याबाबतचे स्पष्टीकरण 18 जुलैला देण्यात आले होते, याकडे रेल्वेने आपल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.
खासगी रेल्वे मार्च 2023 पासून धावतील, असे नियोजन आहे. त्याबाबतच्या निविदांना मार्च 2021पुर्वी अंतिम रुप देण्यात येईल. याबाबत कोणत्याही कारणाने गैरसमज निर्माण झाला असेल तर वरील वस्तुस्थिती ग्राह्य धरावी असे त्यांनी म्हटले आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी दोन जुलै रोजी ऑनलाईन पत्रकार परिषदेत एप्रिल 2023 पासून खासगी रेल्वे धावतील असे स्पष्ट केले होते. खासगी रेल्वे येताच प्रत्येक प्रवाशाला नक्की झालेले तिकीट मिळेल असे सांगितले होते.