तीन कृत्रिम तळे, आरतीसाठी टेबल, 25 जीवरक्षकही उपलब्ध
पिंपरी – प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीच्या पाण्यात विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हा प्रकार टाळण्यासाठी आसवानी असोसिएटने वैभवनगर, पिंपरी येथे तीन मोठी कृत्रिम तळी निर्माण केली आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरघळवून त्याने कुंड्या बनविण्यात येणार आहेत आणि त्या पुढील वर्षी भाविकांना भेट दिल्या जाणार आहेत.
वैभवनगर, पिंपरी येथे आसवानी असोसिएटच्या वतीने एकूण बारा हजार फूट क्षेत्रफळाचा आणि 17 फूट खोलीचा एक, तीन हजार 200 चौरस फूट क्षेत्रफळाचा आणि 17 फूट खोलीचा आणि चार हजार 800 चौरस फूट क्षेत्रफळाचा आणि आठ फूट खोलीचा एक अशी एकूण तीन कृत्रिम तळे उभारण्यात आली आहेत.
येथे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मूर्ती ठेवण्यासाठी ठिकठिकाणी टेबल ठेवण्यात आले आहेत. तसेच मूर्ती विसर्जित करताना कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून 25 जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. गणेश मूर्ती तळ्यात सोडण्यासाठी रबरचा झोपाळा तयार केला आहे. विसर्जन झाल्यानंतर अमोनियम बाय कार्बोनेट हे रसायन पाण्यात टाकले जाते. यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती 20 दिवसात विरघळतात. त्यातून निघणारा काथ्या उपयोगात येत नाही. मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून कुंड्या तयार करुन त्या पुढील वर्षी भाविकांना भेट दिल्या जाणार आहेत.
“”आसवानी असोशिएटच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला. दहा हजार मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तळ्यात झाल्याने मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण टाळता आले.”
विजय आसवानी