पुणे – लॉकडाऊन शिथिल करण्याच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील खासगी कार्यालये सोमवारपासून सुरू होत आहेत. पण, 10 टक्के कर्मचाऱ्यांवरच ऑफिस सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत.
देशात लॉकडाऊन-5 जाहीर करतानाच केंद्रशासनाने तीन टप्प्यांत लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात 8 जूनपासून खासगी कार्यालये, मंदिरे, शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी आहे. पण, राज्यशासनाने आपल्या अधिकारात केवळ खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी उपस्थित सुरू करण्यास मुभा दिली आहे. तसेच जे कर्मचारी कामावर उपस्थित राहतील, ते घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी उपाययोजना तसेच सुरक्षा साधने वापरण्याचेही आदेशात म्हटले आहे. पण, आता वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
ही घ्यावी लागणार खबरदारी
– कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक
– कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर, एकत्रित जेवणास मनाई
– कार्यालयात थर्मल स्कॅनर तपासणी, सॅनिटायझर बंधनकारक
– आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक
– गर्दी करून बैठका घेण्यास मनाई
– कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करावी
– प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोलवता येणार नाही