लक्षवेधी : खासगी आयुष्य, सार्वजनिक जीवन!

-राहुल गोखले

सार्वजनिक जीवनात असणाऱ्यांनी खासगी आयुष्यातही नैतिक असावे. खासगी आयुष्यातील अनैतिकता कधी उघडकीस येईल आणि सार्वजनिक जीवनाला कधी आणि कशी कलाटणी देईल हे सांगता येत नसते.

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्‍तींना देखील खासगी आयुष्य असते आणि त्यात इतरांनी डोकावू नये असे मानणारा एक प्रवाह आहे. ते प्रतिपादन सर्वस्वी चुकीचे आहे, असे मानता येणार नाही. मात्र, दुसरा प्रवाह असेही मानणारा आहे की खासगी आयुष्यातील व्यभिचार हा जर त्या पदाच्या प्रतिष्ठेला, देशातील कायद्याला, त्या व्यक्‍तीच्या आपले कर्तव्य पार पाडण्याला आणि मुख्य म्हणजे नैतिकतेला मारक ठरत असेल तर मात्र ते खासगी आयुष्यदेखील छाननीस पात्र ठरते. खासगी आयुष्य आणि सार्वजनिक जीवन यातील धूसर सीमारेषा नेमकी कुठे आखली जावी यावर जगभर तात्त्विक चर्चा सुरू असते कारण अशा घटना सर्वत्रच घडत असतात.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांच्या विवाहबाह्य संबंधांवरून गदारोळ उठला होता आणि क्‍लिंटन यांना महाभियोगाला सामोरे जावे लागले होते. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रांस्वा ओलां यांनी असेच विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे उघड झाले होते. त्यांचे सोशालिस्ट पक्षाच्या नेत्या सेगोलेने रॉयल यांच्याशी संबंध होते आणि विवाह न करताही त्यांना चार मुले झाली होती. ओलां यांचे अभिनेत्री जुली गायेशीही संबंध होते आणि ऐन अध्यक्षीय निवडणूक तोंडावर असताना माध्यमांनी या संबंधांना तोंड फोडले. साहजिकच ओलां अडचणीत आले; या गौप्यस्फोटानंतर ओलां यांची लोकप्रियता घसरली. त्यांच्या अगोदर फ्रान्सचे अध्यक्ष असणारे सार्कोझी यांचे कार्ला ब्रुनी यांच्याशी असणारे संबंध उघड झाले तेव्हा सार्कोझी यांचीही लोकप्रियता घसरली. मात्र नंतर त्याच कार्ला यांच्याशी सार्कोझी यांनी विवाह केला आणि त्यानां एक कन्यारत्न प्राप्त झाले तेव्हा त्याच सार्कोझी यांना असणारी पसंती पुन्हा वधारली. तेव्हा जगभरात अशा घटना घडत असतात आणि म्हणूनच सार्वजनिक आयुष्यातील व्यक्‍तींच्या खासगी आयुष्याची चव्हाट्यावर चर्चा व्हावी का यावर तात्त्विक चर्चा देखील जगभर झडत असतात. अर्थात याचे उत्तर “हो’ किंवा “नाही’ इतक्‍या स्पष्टपणे देता येणार नाही कारण सत्य हे त्यामध्ये कुठेतरी असते.काही वर्षांपूर्वी हार्वर्ड पोलिटिकल रिव्ह्यूमध्ये “बिहाइंड दि कर्टन्स’ या शीर्षकाचा एक निबंध प्रसिद्ध झाला होता आणि त्यातून याच पैलूचा विचार करण्यात आला होता.

आपल्या नेत्यांच्या खासगी आयुष्याविषयी जनता कोणता दृष्टिकोन ठेवते याबाबत जगभर एकसमान स्थिती नाही. कारण त्या दृष्टिकोनाला देखील काही त्या त्या ठिकाणच्या सांस्कृतिक संकल्पनांची पार्श्‍वभूमी असते. मात्र तो निकष बाजूला ठेवला तरीही मुळात जनतेने नेत्यांच्या खासगी आयुष्याला महत्त्व द्यावे की त्या नेत्याच्या सार्वजनिक कामगिरीला आणि कर्तव्य जाणिवेला महत्त्व द्यावे हा प्रश्‍न सगळीकडे लागू पडतो आणि या दोन्हीचे उत्तर मर्यादित अर्थाने “हो’ असेच आहे. याचे कारण जनता सार्वजनिक जीवनातील व्यक्‍तींना आपले आदर्श मानत असते. तेव्हा आपल्या वर्तनातील आणि व्यवहारातील नैतिकता जपणे हे सार्वजनिक जीवनातील व्यक्‍तीचे कर्तव्यच आहे असे म्हणता येईल. किंबहुना जुडी नॅडलर आणि मिरियम शुलमन यांनी “खासगी आयुष्यात नैतिकता न पाळणारा नेता सार्वजनिक आयुष्यात नैतिक असू शकतो का’ असा प्रश्‍न उपस्थित करून नेत्याच्या खासगी आयुष्यातील व्यवहाराने नैतिकतेची द्विधा स्थिती कशी निर्माण होते यावर खल केला आहे.

अशा अभद्र व्यवहाराची छाननी करण्यासाठी त्यांनी काही प्रश्‍नही उपस्थित केले आहेत: एक, खासगी आयुष्यातील ज्या आक्षेपार्ह व्यवहाराची चर्चा आहे तसा व्यवहार ती व्यक्‍ती अद्यापि करीत आहे का; दोन, ती व्यक्‍ती दांभिक आहे का, म्हणजे सार्वजनिकरित्या कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार करायचा आणि खासगी आयुष्यात मात्र व्यभिचार करायचा; तिसरा, खासगी आयुष्यातील तो अभद्र व्यवहार त्या व्यक्‍तीच्या सार्वजनिक आयुष्यातील कर्तव्याच्या आड येतो का; आणि चार, त्या व्यक्‍तीचे तसे वागणे हे व्यापक नैतिक पर्यावरणावर परिणाम करणारे ठरते का? हे प्रश्‍न तसे सार्वकालिक म्हटले पाहिजेत आणि कोणत्याही अशा घटनेत विचारले गेले पाहिजेत.तेव्हा सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्यांकडून अवाजवी नैतिकतेची अपेक्षा करणे हे जसे चूक तद्वत सार्वजनिक जीवनात संचार असणाऱ्या आणि जबाबदारीचे पद असणाऱ्यांचे खासगी आयुष्य अजिबात तपासायचेच नाही हेही शहाणपणाचे नव्हे. 

सार्वजनिक आयुष्यात वावरणे आणि तरीही आपल्यावर एकही शिंतोडा उडू न देणे ही तशी कसरत. व्यक्‍ती कितीही सार्वजनिक असली तरी तिला खासगी आयुष्य असते हे मान्य केले पाहिजे. तथापि खासगी आयुष्य म्हणजे त्यात काहीही करायला मोकळीक असे मानणे जसे अनुचित; त्यापेक्षाही त्याची लपवाछपवी करणे हे अधिक अगोचरपणाचे. किंबहुना जेव्हा एखाद्याच्या खासगी आयुष्यातील बटबटीत सत्य बाहेर येते तेव्हा जनतेला त्या गौप्यस्फोटाचा धक्‍का बसतोच त्यापेक्षाही या व्यक्‍तीने इतका काळ हे लपवून ठेवून संभावितपणे सार्वजनिक जीवनात संचार केला याचा धक्‍का अधिक बसलेला असतो.

जर हे सत्य बाहेर आले नसते तर त्या व्यक्‍तीने आणखी किती काळ ते जनतेपासून लपवून ठेवले असते हा पहिला प्रश्‍न जनतेच्या मनात येतो. मग ते सत्य विवाहबाह्य संबंधांचे असो; किंवा जमवलेल्या अफाट मायेचे असो किंवा आणखी कसले असो. नेत्याकडून जनतेच्या काही अपेक्षा असतात तद्वत नेता या संकल्पनेविषयी जनतेच्या काही कल्पना असतात. त्या कल्पनांना या रहस्योद्‌घाटनाने जो धक्‍का बसतो त्याने त्या नेत्याविषयी जनतेच्या मनात किंतु निर्माण होतो. नेत्याचा व्यवहार सचोटीचा असायलाच हवा; तथापि खासगी आयुष्यात देखील विधिनिषेध आणि नैतिकता हवी कारण अखेर त्याचेच प्रतिबिंब त्याच्या सार्वजनिक जीवनातील व्यवहारात पडणार असते. खासगी आणि सार्वजनिक या सीमारेषा कितीही अध्याहृत धरल्या तरीही या सीमारेषा तशा धूसरच असतात आणि अनेकदा एकमेकांत मिसळलेल्या असतात.

चारित्र्य आणि नैतिकता ही मूल्ये आहेत आणि त्यांच्याशी तडजोड ही कोणीच करता कामा नये ही फारच आदर्श अपेक्षा असली तरी ती अवास्तव आहे. तथापि सार्वजनिक आयुष्यात असणाऱ्याने मात्र ही मूल्ये कसोशीने पाळली पाहिजेत यात शंका नाही. अन्यथा जेव्हा खासगी जीवनातील काही “भानगडी’ चव्हाट्यावर येतात तेव्हा त्या व्यक्‍तीची इभ्रत पणाला लागते आणि सार्वजनिक जीवन धोक्‍यात येते. जनता कुठलीही आणि कोणतीही सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असणारी असली तरी आपल्या नेत्याने खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात अव्यभिचारी असावे अशीच तिची अपेक्षा असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.