पिंपरी – राज्यभरामध्ये करोनाचा उद्रेक झाला आहे. शासनाच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेनुसार रुग्णांचे खासगी रुग्णालयात शासकीय दराने बिल घ्यावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
त्यानुसार, पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्याच्या विविध योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका आहे, अशा करोनाबाधित रुग्णांना बिलाची रक्कम पुणे महापालिका सीजीएचएस (शासकीय) दराने केली जाणार आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतही अमंलबजावणी करण्यात यावी.
अल्प उत्पन्न गटातील रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंतची वैद्यकीय शुल्क देण्यात येते. पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्याच्या विविध योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत, मात्र ज्यांच्याकडे पिवळी केशरी शिधापत्रिका आहे. अशा करोनाबाधित रुग्णांनी बिलांची रक्कम पालिका सीजीएचएस दराने केली जाणार आहे. तसेच हा निर्णय घेताना पिंपरी चिंचवड शहरात जे रुग्ण या योजनांचे लाभार्थी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या देखील बिलांची रक्कम शासकीय दराने घेण्यास खासगी रुग्णालयांना सूचित करावे.
तसेच शक्य असल्यास ठराविक रक्कम पालिकेने अदा करावी. शासनाच्या आरोग्य योजनाननुसार शहरातील रुग्णांना लाभ दिला जावा. याची देखरेखीसाठी स्वतंत्र विभाग काही कालावधीसाठी कार्यान्वित करण्याची मागणी कलाटे यांनी केली आहे.