‘सीपीएम’ ऍप्लिकेशन वापरास नकार; बेड अडवल्याचे होत आहे उघड
पुणे – करोनाच्या गंभीर होणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेने बेड राखीव ठेवलेल्या रुग्णालयांसाठी पालिका आणि स्मार्टसिटीकडून “क्रिटीकल पेशंट मॉनिटरींग’ (सीपीएम) ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मात्र, या ऍप्लिकेशनचा वापर सुरू होताच, शहरातील दोन हॉस्पिटलने अनावश्यकपणे करोना रुग्णांसाठी तब्बल 20 बेड अडवून ठेवल्याचे समोर आले.
त्यामुळे महापालिकेने रुग्णालयांशी तत्काळ संपर्क साधून या रुग्णांना डिस्चार्ज करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, या ऍप्लिकेशनमध्ये गंभीर रुग्णांची माहिती तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती भरायची असल्याने आम्हाला माहिती देण्यास वेळ नाही, असे सांगत खासगी हॉस्पिटल ऍप वापरण्यास नकार देत आहे.
पालिकेकडून शहरातील 54 रुग्णालयांचे बेड करोना उपचारासाठी राखीव करण्यात आले आहेत. त्यानुसार, त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेल्या बेडचा वापर करोना रुग्णांसाठी करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णालये ही माहिती लपवित असल्याने या रुग्णालयांना महापालिकेने सीपीएम हे ऍप्लिकेशन वापरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, या हॉस्पिटलनी गंभीर रुग्णांच्या उपचाराची माहिती दर चार तासांनी अपडेट करायची आहे तसेच त्यांच्यावर काय उपचार केले जात आहेत याची माहिती द्यायची आहे. त्यामुळे एका क्लिकवर गंभीर रुग्णांवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे.
तसेच, रुग्णांवर केलेले उपचार लक्षात येत असल्याने त्यांच्या बिलाची खातरजमा करणेही शक्य होणार आहे. मात्र, 54 मधील केवळ 17 हॉस्पिटलकडूनच ही माहिती ऍप्लिकेशनवर भरण्यात आली. या माहितीमुळे रुग्न आणि प्रत्यक्ष बेडची माहिती मिळत असल्याने रुग्णालयांना बेडची माहिती लपविता येत नाहीये. त्यामुळे अनेक हॉस्पिटलने आम्ही उपचार करायचे की तुम्हाला माहिती द्यायची, अशी कारणे पुढे करत पालिकेविरोधात करोना नियंत्रणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी येत आहेत.
काही तासांतच 20 बेड झाले रिकामे…
या ऍप्लिकेशनमध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर महापालिकेने मंगळवारी अवघ्या काही तासांत 20 बेड रिकामे केले. माहिती भरलेल्या 17 मधील दोन रुग्णालयांकडून 20 करोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतरही ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडवर ठेवले असल्याचे समोर आले. या रुग्णांना सुरू असलेल्या उपचाराच्या माहितीवरून महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली. त्यामुळे पालिकेने तत्काळ संबंधित रुग्णालयांशी संपर्क साधून हे बेड रिकामे करून संबंधित बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे इतर 20 रुग्णांना हे बेड मिळण्यास मदत झाल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.