- कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक
- वाचानालये व अभ्यासिकाही सुरू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या टप्याटप्याने कमी होत आहे. त्यामुळे मिशन बिगीन अगेन अंतर्गत महापालिका हद्दीमध्ये नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्यानुसार शहरातील खासगी कोचिंग क्लास, संगणक प्रशिक्षण संस्था व वाचनालये सुरू करण्यात आली आहे. मात्र या संस्था सुरू करत असताना करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
शहरातील वाचनालये व खासगी क्लास सुरू करण्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रशिक्षण संस्था, संगणक प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक व खासगी वाचनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये इयत्ता नववी पासून पुढील कोचिंग क्लास सुरू करण्यात येणार आहे. सर्व खासगी क्लास व प्रशिक्षण संस्थांना करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये संस्थेत प्रवेश करतेवेळी सर्व विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करणे. प्रत्येक प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक व कर्मचाऱ्याने नियमित मास्कचा वापर करणे. सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांनी करोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे व त्याचा अहवाल संस्थेमध्ये जमा करणे. खासगी कोचिंग क्लासच्या प्रवेशद्वारावर व बैठक हॉलमध्ये सॅनिटायजर ठेवणे. क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून सामाजिक अंतराचे पालन करणे.
तसेच शहरातील उद्यानांमध्ये सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आलेख गेल्या महिन्याभरापासून स्थिर आहे. शहरात दररोज सरासरी 150 करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तसेच लसीकरणही सुरू झाले आहे. त्यामुळे शहरात नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्यानुसार आता शहरातील खासगी कोचिंग क्लास व अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.