अनधिकृत पार्सल नेल्यास खासगी बस जप्त? 

दिवाकर रावतेंचा इशारा ः मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत निर्णय 

मुंबई – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला असलेला धोका आणि रायगड जिल्ह्यातील आपटा एसटीमध्ये मिळालेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमिवर परिवहन विभागाने प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेताना खासगी बसेसना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे खासगी प्रवासी बसमधून अनधिकृत कुरिअर, पार्सल वाहतूक किंवा लगेज वाहतूक केल्यास संबंधित बसेसचा परवाना निलंबित करून जागच्या जागी बस जप्तीची कारवाई करणार, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला.

रायगड जिल्ह्यात एसटीमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात आज मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

प्रवाशांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून यासाठी गृह आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे. दुर्दैवाने प्रवासी वाहतुकीत स्फोटके सापडण्यासारखी किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्यावेळी चालक तथा वाहकाने नेमके काय करावे, कोणाशी संपर्क साधावा आदी बाबतही एक सूचनावजा परिपत्रक तथा एसओपी निर्गमीत करण्यात यावा, अशी सूचना गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली.

…तर चालक-वाहकांवरही कारवाई

खासगी बसेवर कारवाईचा बडगा उगारतानाच दिवाकर रावते यांनी एसटीच्या चालक-वाहकांनाही कारवाईचा इशारा दिला आहे. एसटी बस वाहतुकीच्या सुरक्षिततेचा विषयही महत्वाचा असून एखाद्या एसटी बसचालकाने अथवा वाहकाने अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम त्याच्यावर बदलीची आणि दुसऱ्यांदा थेट बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही रावते यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रत्येक एसटी स्थानकावर पोलीस चौकी

आपटा एसटीमध्ये मिळालेल्या स्फोटकामुळे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर पोलीस चौकीची उभारणी करण्यात यावी, अशा सूचनाही रावते यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

Leave A Reply

Your email address will not be published.