पुणे – खासगी बसमालकांना बसनार फटका

पुणे  – दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने “शिवशाही’च्या स्लिपर कोचच्या दरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका खासगी बसचालकांना बसणार आहे. त्यामुळे या बसचालकांनी या निर्णयाची धास्ती घेतली आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या बसेसच्या प्रवास भाड्यातही काही प्रमाणात कपात करण्याचे संकेत काही चालकांनी दिले आहेत.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही, अश्‍वमेध, हिरकणी या वातानुकुलित आणि आरामदायी बसेस सुरू केल्या आहेत. त्यांचे दरही किफायतशीर असल्याने खासगी बसेसचा वापर करत असलेला प्रवासी एसटी महामंडळाच्या बसेसकडे आकर्षित झाला आहे, त्यामुळे खासगी बसचालकांची मक्तेदारी काही प्रमाणात मोडीत निघाली आहे. मात्र, स्लिपर कोचची मक्तेदारी मोडीत काढण्यास महामंडळाला अपेक्षित यश आले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाच्या वतीने बहुतांशी लांब पल्ल्यांच्या मार्गावर “स्लिपर कोच’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता, या बससेवेचे दर किफायतशीर असल्याने प्रवासी महामंडळाकडे आकर्षित झाला आहे.

मात्र, ही बससेवा अधिक लोकप्रिय व्हावी आणि खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकावे, यासाठी महामंडळाने आणखी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या बससेवेचे दर कमी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्याबाबतची घोषणा केली असून येत्या 13 तारखेपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे खासगी बसचालकांना त्याचा फटका बसणार आहे.

 एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसचे दर कमी केल्याने त्याचा फटका आम्हाला निश्‍चितच बसणार आहे, त्यामुळे आगामी काळात या प्रकाराची दखल घ्यावीच लागणार आहे. दर कमी करायचे अथवा असेच ठेवायचे यासंदर्भात सर्वानुमतेच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, एसटी महामंडळापेक्षा अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

-समीर शेख, खासगी बसचालक, शिवाजीनगर.

 
एसटी महामंडळाने या बसेसचे दर कमी केल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे, त्यामुळे एसटी महामंडळाला धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. मात्र, महामंडळाने आगामी काळातही हे दर असेच ठेवण्याची आवश्‍यकता आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही हे दर असेच ठेवल्यास महामंडळाचा प्रवासी आणखीन वाढणार आहे.

-निलेश चव्हाण, प्रवासी, अकोला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)