पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली

अतिवृष्टीमुळे आवक घटली, भावही वाढले

पुणे – सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी या फळभाज्यांसह मेथी आणि अळूच्या पानांना मागणी वाढली आहे. त्यातच जिल्ह्यासह पुणे विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने, तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने भाज्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी, भाज्यांना गेल्या वर्षीचा तुलनेत 10 ते 20 टक्के अधिक भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केट यार्डात जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून फळभाज्या तसेच पालेभाज्यांची आवक होते. यंदा पुण्यासह सांगली, कोल्हापूर आणि सातार्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तर, सोलापूर आणि अहमदनगर पट्ट्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. येथील बाजारात दररोज सर्व प्रकारचा मिळून सरासरी 80 ते 100 ट्रक शेतमाल दाखल होत आहे. पितृपक्षाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात भेंडीची आठ ते दहा टेम्पो, कारली सात ते आठ टेम्पो, गवार सात ते आठ टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो दाखल होत आहे. याखेरीज, मेथीची पन्नास ते साठ हजार जुडींची आवक होत आहे.

बाजारात गवार, भेंडी, तांबडा भोपळा यांची 40 ते 60 रुपये, काकडीची 40 रुपये प्रतिकिलो भावाने तर अळुचे पान आणि मेथीच्या जुडींची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात येत आहे. पितृपक्षात नैवेद्यासाठी विविध भाज्या एकत्र करून एक स्वतंत्र भाजी बनविण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.