इंदापूर : आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या संकल्पनेतून कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदापूर क्रीडा महोत्सव क्रीडा संकुल अंथुर्णे येथे उत्साहात पार पडला.रविवार सायंकाळी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत पै.पृथ्वीराज कोकाटे (सराटी) विरुद्ध पै.मामासाहेब तरंगे (तरंगवाडी) या दोघांमध्ये पार पडली. यात कोकाटे याने बाजी मारत इंदापूर केसरी किताबाची मानाची गदा पटकावली.
तालुक्यातील युवक-युवतींना खेळाचे व्यासपीठ तयार व्हावे हा हेतु ठेऊन आयोजित केलेल्या या महोत्सवास अधिकाधिक खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद पहावयास मिळाला. महोत्सवात 2500 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.यामध्ये तालुक्यांतील गावनिहाय संघ सहभागी झाले होते.यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल ,बॅडमिंटन, मॅरेथॉन , कुस्ती (14 वर्षाखालील किशोर केसरी,17 वर्षाखालील कुमार केसरी, ओपन गट इंदापूर केसरी) या खेळांचा समावेश होता.
यामध्ये पार पडलेल्या किशोर केसरीची गदा पै. चंद्रहास नरळे (बिजवडी),तसेच कुमार केसरीची गदा पै. यश चोरमले (शिरसोडी) यांनी पटकावली तर क्रिकेट स्पर्धेत गलांडवाडी नं. 1 , कबड्डी स्पर्धेत मुलींमध्ये एस. बी.स्पोर्ट्स पळसदेव मुलांमध्ये महाराणा संघ कळंब, व्हॉलीबॉल स्पर्धेत बोरी अ संघ, बॅडमिंटन (दुहेरी) स्पर्धेत मुलींमध्ये रिशा गोयल आणि राधिका बलवंड, मुलांमध्ये संस्कार शिवशरण आणि सलिल मणेरी (वालचंदनगर), मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये शितल भगत तर मुलांमध्ये गणेश खोमणे यांनी विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण समारंभात बोलताना आमदार भरणे यांनी खेळाडूंचे कौतुक करून येत्या काळात तालुक्यातील खेळाडूंनी राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करणेसाठी प्रयत्नशील रहावे व खेळाडूंना येणाऱ्या अडचणीत पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. तसेच इंदापूर आणि अंथुर्णे येथे उभारलेल्या अत्याधुनिक क्रिडा संकुलांचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर क्रिडा स्पर्धा यशस्वी करणेकामी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांनी गेली १५ दिवस अथक परिश्रम घेतले.या स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.