विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
मुंबई- विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांनी सोमवारी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भाजप-शिवसेना युतीचे विधानसभेतील संख्याबळ पाहता कॉंग्रेस पोटनिवडणुकीसाठी उमदेवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि सदस्य शिवाजीराव देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या (मंगळवारी) संपत आहे. भाजपने पोटनिवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील नेते पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
देशमुख यांचा कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात जनाधार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने देशमुखांना ताकद दिली आहे. विधानपरिषदेवर निवडून आल्यास देशमुख यांना 24 एप्रिल 2020 पर्यत काम करता येईल. देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार राज पुरोहित, सुधीर गाडगीव, डॉ. नीलम गोऱ्हे, संजय केळकर आदी उपस्थित होते.