देवेंद्र फडणवीसांच्या आकडेवारीला पृथ्वीराज चव्हाणांचे सडेतोड उत्तर

मुंबई – केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी द्यावी, असे थेट आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसे केल्यास अधिक स्पष्टता येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, असेही ते म्हणाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एक व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे दोन लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी विविध योजनेअंतर्गत राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये ही रोख रक्कम आहे. उर्वरित १९ लाख कोटी हे कर्जाच्या स्वरुपातील मॉनेटरी स्टीम्युलस आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये रोख रक्कम मिळू शकते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यामध्ये अनेक शर्थी आहेत. जो त्या अटी-शर्थी पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल, त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदाहरणार्थ किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी तीन लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का? आणि ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन सक्ती करु शकतं का? त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे हे चुकीचं आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.