पृथ्वीराज चव्हाणांचाही स्वबळाचा नारा

मुंबई- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी येत्या काळात स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच चर्चांना तोंड फुटले असताना आता कॉंग्रेसजे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.

एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी बऱ्याच प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यात बराच गोंधळ घातला होता. त्यामुळे त्या पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.

त्यामुळे या सरकारला अजिबात धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या संदर्भातील आमचे उद्दिष्ट अजुनही तेच असून आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात आज कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. जर आम्हाला पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल करतानाच आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल व आतापर्यंत तसेच होत आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सरकार एका विशिष्ट ध्येयाने स्थापन करण्यात आले आहे. शिवसेनेबाबत सुरूवातीला थोडी भिती होती. मात्र त्यांची विचारसरणी आम्ही सहन करू शकतो पण भारतीय जनता पार्टीचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची जी बैठक बोलावली त्याचे चव्हाण यांनी स्वागत केले. पवार जर भाजपच्या विरोधात लढत असतील तर त्याचे स्वागतच असल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.