प्रचार सभांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती 

…तर लोकशाहीच अस्तित्वात राहणार नाही

कराड – आम्ही सरकारवर आकसातून टीका करीत नाही. तर त्यांचा कारभारच बजबजपुरीचा आहे. सीबीआय, आरबीआय, निवडणूक आयोग आदी सर्वोच्च संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या असून त्यांची स्वायत्तता मोडीत काढली आहे. त्यामुळे आता लोकशाहीच अस्तित्वात राहणार नाही व कदाचित पुन्हा निवडणुकाच व्हायच्या नाहीत, अशी भीती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात सैदापूर, गोवारे येथे झालेल्या जाहीर सभात ते बोलत होते. यावेळी श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजेश पाटील वाठारकर, जयंतकाका पाटील, अविनाश नलवडे, पंचायत समिती सदस्या वैशालीताई वाघमारे, उदय थोरात, राजाभाऊ उंडाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन 2014 च्या निवडणुकीत आमची चूक झाली आणि विरोधी मतदान आम्हास एकजूट करता आले नाही. मात्र आता अशी चूक आम्ही पुन्हा करणार नाही. विरोधातील सर्व पक्षांची आघाडीद्वारे मोट बांधली आहे. असे सांगून आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या निवडणुकीत हिंदी भाषिक प्रदेशात बीजेपीच्या 100 जागा घटतील. भाजपला 270 सोडाच, पण 170 जागाही मिळणार नाहीत. त्यामुळे आपोआपच कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचेच सरकार अस्तित्वात येईल. यापूर्वी अटलजींचे सरकार होते. तेसुध्दा भाजपकडूनच पंतप्रधान झाले होते, मात्र त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास होता. सध्याचे सरकार मात्र ठराविक कंपूबाहेर येत नाही.

सैदापूर, गोवारे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभांवेळी अजितराव पाटील, शिवाजीराव जाधव, सचिन पाटील, नीलेश जाधव, सुनील जाधव, रणजित पाटील, धनाजी जाधव, तानाजी माळी, बाळासाहेब जाधव, रामभाऊ कणसे, सौ. संगिताताई कुंभार, राहूल चव्हाण, पोपट साळुंखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दहशत आहे ती लोकसेवा अन्‌ लोकहितासाठी

विरोधकांकडे प्रचारासाठी काही मुद्दाच नाही. त्यामुळे ते माझ्या नसलेल्या दहशतीचे भूत उभे करीत आहेत. वास्तविक माझी दहशत असेल, नव्हे आहेच. मात्र ती लोकसेवा आणि लोकहितासाठीच असते आणि ती मी ठेवणारच. तसेच लोकहितासाठी आवश्‍यक ती पाऊलेही मी उचलणारच. मी माझ्या कामातून उभा राहिलो आहे. मी आमदार झालो, कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो, मंत्री आणि खासदारही झालो. हा माझा राजकीय प्रवास दहशतीमुळे झालेला नाही. काही लोकांना सवयच असते की, आपण कोणतेही काम करू शकत नाही, हे त्यांचे लक्षात आल्यावर स्वतःच्या गाडीवर दगड मारून घ्यायचा आणि सहानुभूती मिळवायची. त्यामुळे याबाबत लवकरच पोलीस अधीक्षकांना भेटून जी काही झेड सुरक्षा असेल ती सर्व विरोधी उमेदवाराला द्या, असे मी सांगणार आहे. विनाकारण माझी बदनामी नको. 150 किलोमीटरच्या मतदारसंघात त्यांना पोचता येत नाही. त्यामुळे ते माझ्या बदनामीचे षडयंत्र रचत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.