पृथ्वीराज चव्हाण यांची साताऱ्यात राजकीय खलबते

सातारा  – कॉंग्रेसचे सातारा जिल्हयातील कराड दक्षिणचे एकमेव आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी कॉंग्रेस कमिटीत कार्यकर्त्यांशी दीड तास चर्चा केली. अत्यंत गोपनीयतेने झालेल्या या बैठकीत कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

आता या विषयावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही, जिल्हाध्यक्ष कोण, हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष निवडीचा चेंडू कार्यकर्त्यांच्या कोर्टातच टाकला आहे. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पोवई नाक्‍यावर जेवणावळी सुरू असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस कमिटीत दुपारी बारा वाजता येऊन कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी कार्याध्यक्ष विजयराव कणसे, ऍड. बाळासाहेब बागवान, किरण बर्गे, सुरेश जाधव, विराज शिंदे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.

सातारा जिल्हा कॉंग्रेसची आगामी वाटचाल, संघटन मजबुती, सदस्य नोंदणी, कार्यक्रम विस्तारीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या निमित्ताने पक्षबांधणी महत्वाची आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. राज्यात महा विकास आघाडीच्या निमित्ताने कॉंग्रेस सत्तेत आहे. सदस्यांची कामे होण्याकरिता अजेंडा ठरवून कामाचा पाठपुरावा करणे, कॉंग्रेस म्हणून राजकीयदृष्टया संघटित राहणे आदी मुद्यांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस सदस्यांशी सविस्तर संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते माढा मतदारसंघातून खासदारही झाले. त्यांच्या या पक्ष बदलामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कॉंग्रेसला दणका बसला. त्यापाठोपाठ माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले. एकूणच जिल्ह्यातील कॉंग्रेसला गळती लागली. याची सुरवात वाईच्या मदन भोसले यांच्यापासून झाली.

या सर्वांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ना काही आश्‍वासन दिले होते. पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि सत्तेत सहभाग असल्यामुळे आपापल्या मतदारसंघात चांगल्या प्रकारे विकासकामे करता येतील, या आशेवर हे सर्व जण भाजपमध्ये गेले. त्यामुळे पक्ष मजबुतीवर भर देण्याचे आव्हान कॉंग्रेससमोर आहे.

जिल्हाध्यक्षपदाची ताणली उत्सुकता
जिल्हाध्यक्ष निवडीच्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली. तेव्हा तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र, तो राजकीयदृष्टया प्रगल्भ व संघटन कौशल्य असणारा उत्कृष्ट समन्वयक असावा, असे चव्हाण यांनी सांगत आता यापुढे चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरवातीला जिल्ह्यातील कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळणार हे निश्‍चित झाले करण्यात आले होते.

मात्र, कॉंग्रेसच्या तंबूत राजकीय व सक्रिय चेहरेच नसल्याने जिल्हाध्यक्ष निवड सतत लांबणीवर पडते आहे. या पदासाठी जिल्ह्यातून डॉ. सुरेश जाधव, ऍड. बाळासाहेब बागवान, हिंदूराव पाटील आणि किरण बर्गे यांची नावे आघाडीवर आहेत. यातील दोघांच्या नावावर सर्वमत झाल्याचे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतून सांगितले जात आहे. मात्र, आता कोणतीही चर्चा न होता येत्या चार दिवसांत जिल्हाध्यक्षपदाच्या नावाची थेट घोषणा होईल, असे संकेत कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.