उत्तरप्रदेशमध्ये तुरूंगातच गॅंगवॉरचा भडका; धुमश्‍चक्रीत तीन कैदी ठार

चित्रकूट  -उत्तरप्रदेशात शुक्रवारी चक्क तुरूंगातच गॅंगवॉरचा भडका उडाला. त्यातून अतिसुरक्षित तुरूंगात धुमश्‍चक्री उडून कुख्यात गुंड असणारे तीन कैदी ठार झाले.

रगौली जिल्हा कारागृहात काही कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून कैद्यांचे दोन गट पडले. त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी एक तुरूंग अधिकारी संबंधित ठिकाणी पोहचला. त्यावेळी अंशुल दीक्षित या कैद्याने अधिकाऱ्याचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार सुरू केला. त्याने मेराजुद्दीन आणि मुकीम काला या कैद्यांवर जवळून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये ते दोघेही मृत्युमुखी पडले.

त्यानंतर दीक्षितने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पाच कैद्यांना ओलीस ठेवले. त्यांनाही मारण्याची धमकी दीक्षितने दिली. गोळीबार आणि गोंगाटामुळे तुरूंगाचे सुरक्षा अधिकारी आणि रक्षक संबंधित ठिकाणी जमा झाले. त्यांनी केलेल्या कारवाईत दीक्षित मारला गेला.

कैद्यांमधील संघर्षानंतर तुरूंगात अतिरिक्त सुरक्षा बळ तैनात करण्यात आले. आता तेथील स्थिती नियंत्रणात असल्याचे समजते. वर्चस्ववादातून कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुरूंगात धुमश्‍चक्री उडाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्या तिन्ही कैद्यांवर खून, खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरम्यान, तुरूंगात घडलेल्या थराराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.