पुणे – ससून रुग्णालयात ड्युटी लावल्याने कारागृहातील कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याला खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर (55, रा.शासकीय वसाहत, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार कर्मचारी जयकुमार सोमनाथ शिंदे(39, रा.शासकीय कर्मचारी निवासस्थान) याच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारागृहातील आरोपी प्रकाश फाले यास ससून रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी जयकुमार शिंदेला ससून रुग्णालयात रात्रपाळी ड्युटीस जाण्याचे लेखी आदेश दिले होते. याचा राग मनात धरुन शिंदे त्यांच्या केबीनमध्ये गेला. त्याने फिर्यादींना दररोज मला ससून रुग्णालयात जाण्यास सांगतोस, तुझा आदेश असला तरी मी ससून रुग्णालयात जाणार नाही. यानंतर लेखी आदेश फिर्यादीच्या अंगावर फेकून दिला. फिर्यादीने त्याला वरिष्ठांना बोलण्याची अशी पध्दत आहे का? अशी विचारणा करताच त्याने रागाच्या भरात त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेतला.
यानंतर मी कोणत्याही परिस्थितीत ससून रुग्णालयात ड्युटीला जाणार नाही, मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर त्याला काही कमी जास्त झाले तर मी तुझ्या खानदानीला मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहेत.