शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार

आळंदी – महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिका शाळांतील शिक्षक गुणवत्तापूर्ण काम करीत असल्याने शाळांची पटसंख्या वाढत आहे. या शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्याने सोडविले जातील, असे आश्‍वासन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आळंदी येथे शनिवारी (दि. 21) राज्यस्तरीय शिक्षण परिषद व राज्य आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आळंदीच्या वतीने करण्यात आले होते, त्यावेळी आयुक्‍त सोळंकी बोलत होते. यावेळी ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव व राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे सदस्य अजित सुरेश वडगांवकर, राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, आळंदीच्या प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने, खोपोलीच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे उपस्थित होते.

विशाल सोळंकी म्हणाले, शिक्षक संघाने शिक्षण परिषद घेऊन राज्यातील गुणवंत शाळा व गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रेरणा दिली आहे. नगरपालिका व महानगरपालिकाच्या शासकीय शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते ही समाधानाची बाब आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या वाढल्याने शिक्षकांची आवश्‍यकता आहे तेथे प्राधान्याने शिक्षक दिले जातील, ऑनलाइन बदली पोर्टल, जुनी पेन्शन हक्‍क योजना, 100 टक्‍के वेतन याबाबत संघटनेबरोबर स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्‍न सोडविले जातील. यावेळी त्यांच्या हस्ते आदर्श शाळा व आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×