जनतेच्या विकासकामांना प्राधान्य

खा. उदयनराजे : यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेतले दर्शन

कराड  – लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघातील जनतेने तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्‍वासास पात्र राहून पाच वर्षाचे कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्याच कामांना प्राधान्य देणार आहे. या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर माझाही विश्‍वास नसल्याचे स्पष्ट मत खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खा. उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले. विजयानंतर पहिल्यादाच ते शुक्रवारी सकाळी कराडला आले होते. स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ, पी. डी. पाटील समाधीस्थळ येथे जावून त्यांनी अभिवादन केले. यानंतर पंकज हॉटेल येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, राजेंद्रसिंह यादव, सुनील काटकर, ऍड. राजाभाऊ पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

खा. भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदार संघातील तमाम मतदारांनी मला मतदान देत जो विश्‍वास दाखविला आहे. त्या सर्व ज्ञात-अज्ञातांचे आभार मानतो. या निवडणुकीत आजी माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे. या निवडणुकीत वैचारिक मते लाखमोलाची आहेत. पाच वर्षात सर्वाच्या विचारातून प्रत्येक विधानसभा मतदार संघात विकासकामे राबविणार आहे. 2014 मधील निवडणुकीत जिल्ह्यातून 5 लाख 20 हजाराचे मताधिक्‍य मिळाले होते. यावेळचे मताधिक्‍य लक्षात घेता 5 लाख 80 हजार मतदान झाल्याचे दिसून येत आहे.

यावरुन गतवेळी पेक्षा यावेळी त्याच्यात वाढच झाली आहे. यावरुन जनतेचा माझ्यावरील असलेला विश्‍वास दिसून येत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमीच मी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही खा. उदयनराजे यांनी यावेळी सांगीतले. कराडात शुक्रवारी आलेल्या खा. उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. व आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.