रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामध्ये व्याजदरात बदल नाही
मुंबई -किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर सध्या 6.09 टक्के आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने आज जाहीर केलेल्या पतधोरणात आपले व्याजदर म्हणजे रेपोदर आणि रिव्हर्स रेपोदर यापूर्वीच्या पातळीवर कायम ठेवले आहेत.
रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बॅंक व्यावसायिक बॅंकांना छोट्या मुदतीचे कर्ज देते तो दर चार टक्के आहे. तर बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेत ठेवलेल्या ठेवीवरील व्याजदर म्हणजे रिव्हर्स रेपोदर 3.35 टक्के आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. आता बऱ्याच क्षेत्रांत उत्पादकता वाढू लागली आहे. त्यामुळे आणखी पाव टक्क्याची व्याजदर कपात होईल असे काही विश्लेषकांना वाटले होते. मात्र, एकूण परिस्थिती पाहता महागाई हाताबाहेर जाऊ न देण्याचे रिझर्व्ह बॅंकेने ठरविले आहे. पतधोरण समितीच्या सदस्यांनी गरज पडल्यास आगामी काळात व्याजदर कपातीची शक्यता खुली ठेवली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने महागाई चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, सध्या किरकोळ किमतीवरील महागाई सहा टक्क्यांच्या वर आहे. बॅंकेने गेल्या वर्षी रेपोदरांमध्ये 1.35 टक्क्यांची कपात केली होती. त्याचबरोबर फेब्रुवारीपासून बॅंकेने रेपोदरात 1.15 टक्क्यांची कपात केली आहे.
व्यावसायिक बॅंकांनी त्यातील जवळजवळ 0.80 टक्के कपात ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास मदत मिळत असल्याचे बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. व्याजदर कपातीबरोबरच बॅंकेने भांडवल सुलभता मुबलक राहण्याकरिता आक्रमक उपाययोजना केल्या आहेत.
नॅशनल हाऊसिंग बॅंकेसाठी भांडवल
घरबांधणी क्षेत्राला भांडवल पुरवठा उपलब्ध व्हावा याकरिता रिझर्व्ह बॅंकेने नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बॅंकेला रेपोदरावर 5000 कोटी रुपये उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. ही मदत पुरेशी नाही. मात्र, तरीही सध्याच्या परिस्थितीत या क्षेत्रांना आधार मिळावा म्हणून रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला असल्याचे समजले जाते. देशातील काही विकासकांनी रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
दृष्टिक्षेपात पतधोरण
– रेपोदर 4 टक्क्यांवर कायम
– रिव्हर्स रेपोदर 3.35 टक्क्यांवर कायम
– सोन्याच्या मूल्याच्या 90 टक्के कर्ज मिळणार
– काही क्षेत्रातील कर्जाची फेररचना
– महागाई 5 टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता
– विकासदर 0(शुन्य) टक्क्यांच्या खाली राहणार
– व्याजदर कपातीची शक्यता खुली
– लघुउद्योगांच्या कर्ज फेररचनेला मुदतवाढ
– स्टार्टअप् प्राधान्यक्रमाच्या यादीत
– एनएचबीला 5 हजार कोटी रुपयांचे भांडवल
– नाबार्डला 5 हजार कोटी रुपयांचे भांडवल