पुणे: राष्ट्रीय गोल्फमध्ये यंदा सहा वेळा पदक तालिकेत स्थान मिळविणाऱ्या पुण्याच्या आर्यमान सिंगने इंडियन गोल्फ युनियनच्या राष्ट्रीय ज्युनियर गोल्फ मानांकन यादीतील आपल्या वयोगटात अग्रमानांकन पटकावले आहे. मुलांच्या 13 वर्षांखालील हा बहूमान मिळविणारा महाराष्ट्राचा तो पहिलाच ज्युनियर गोल्फपटू ठरला आहे.
आर्यमानने यावर्षी झालेल्या स्पर्धांपैकी पुण्यातील पूना क्लब, क्लोव्हर ग्रीन्स बंगळुरू, गोलमुरी गोल्फ कोर्स जमशेदपूर, टॉलिगंज कोलकता आणि अखेर ग्रेटर नोएडा येथील जेपी ग्रीन येथे पार पडलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सत्रातही पहिल्या तीन क्रममांकात स्थान मिळवून एकूण सहा करंडक पटकावले आहेत. या कामगिरीमुळे आर्यमानने राष्ट्रीय मानांकनात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
त्याआधी आर्यमानने इंडियन गोल्फ युनियनच्या पश्चिम विभागीय ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये सलग चौथ्या वर्षी प्रत्येक स्पर्धेत अपराजीत राहात लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने मुंबई, पुणे, बडोदा आणि अहमदाबाद या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावून सर्वोच्च स्थान राखले.
राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्यापूर्वी आर्यमानने ज्युनियर स्तरावरील एक अव्वल गोल्फपटू म्हणून नाव मिळविले होते. पश्चिम विभागीय ऑर्डर ऑफ मेरिट सलग चार वेळा जिंकून त्याची ही कामगिरी राष्ट्रीय विक्रम ठरली.