पाणीप्रश्‍न, मेट्रोसाठी भूसंपादनास प्राधान्य

नवनियुक्‍त पालकमंत्री चंद्रकांत पाटील ः जिल्हाधिकारी, पालिका आयुक्‍तांशी चर्चा

यापुढे पाण्यावरूनच वाद होणार

“गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु नागरिकांनी काळजी करू नये. आता यापुढे पाण्यावरूनच वाद होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. सर्वांनाच पाणी मिळाले पाहिजे, पाण्याच्या विषयावर सर्वांनी एकत्रित येउन काम करण्याची गरज आहे, अशी आमची भावना आहे. तर नीरा देवधर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे अधिवेशनादरम्यान बैठक घेणार असून त्यातून या धरणातील पाणी वाटपाबाबत मार्ग काढण्यात येईल,’ असेही पाटील त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे – “शहरातील पाणी प्रश्‍न सोडविणे आणि मेट्रो प्रकल्पाकरीता भूसंपादन या दोन गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्‍तांसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोचा एक टप्पा सुरू करू,’ असा विश्‍वास नवनियुक्‍त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत शहरातील काही प्रश्‍नांवर चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार आणि माजी पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

“पाणीटंचाई निर्माण झाली असली, तरी जून अखेरपर्यंत कोणतीही कपात करणार नाही,’ असे सांगत पाटील म्हणाले, “राज्यात 17 ते 22 जून पर्यंत पावसाला सुरुवात होईल आणि देशात 94 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुण्यात पुढील काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता कमी आहे. मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादनाची अडचण भेडसावत आहे. त्यातून मार्ग काढला जाईल. त्यादृष्टीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.