पिंपरी -मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सुमारे 16 हजार वाहन परवान्यांचे प्रिटींग जवळपास 20 दिवसांपासून रखडले आहे. वाहन परवान्यांसाठी लागणारे कार्ड आणि प्रिटींगची चीप उपलब्ध नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन परवान्यांसाठी सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शहरातील दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांची नोंद करण्यात येते. या कार्यालयात वाहनचालकांना वाहन परवाने देखील दिले जातात. एखाद्या व्यक्तीने आरटीओमध्ये वाहन चालविण्याचा परवाना घेतला असता त्यांना पोस्टाने वाहन परवाना पाठविण्यात येतो. मात्र, ही प्रक्रिया वेळकाढू आहे.
या प्रक्रियेत अनेकांचे वाहन परवाने, आरसी बुक हरवलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने डुप्लिकेट वाहन परवाना, आरसी बुक काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या सुमारे 16 हजार वाहन परवान्यांचे प्रिटींग 23 मार्चपासून रखडले आहे. आत्तापर्यंत 20 दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही हे काम कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे 16 हजार वाहन परवान्यांच्या प्रिटींगचे काम सध्या बाकी आहे. सेवा पुरवठादार कंपनीने येत्या गुरुवारपासून (दि. 14) हे काम पुर्ववत सुरू होईल, असे कळविले आहे. प्रिटींगसाठी लागणारी चीप आणि कार्ड उपलब्ध नसल्याने सध्या ही अडचण निर्माण झाली आहे. हे काम सोपविलेल्या कंपनीशी याबाबत 23 मार्च, 29 मार्च आणि 5 एप्रिल असा तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ.