- डिजिटल, सोशल मीडियामुळे व्यवसायावर परिणाम
पिंपरी – समाजमाध्यमांच्या वाढीमुळे प्रिंटिंग प्रकारातील उत्पादनांना मोठा फटका बसला आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून करोना संसर्गामुळे प्रिंटिंग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनच्या शक्यतेने निम्म्यावर आलेल्या व्यवसायाला 30 टक्क्यांवर नेऊन पोहोचविले आहे, अशी व्यथा पिंपरी-चिंचवड शहरातील या व्यावसायिकांनी मांडली.
लग्नपत्रिका, नियतकालिके, बिल पुस्तक, प्रचार साहित्य, कार्यालयीन साहित्य, शालेय साहित्य, पुस्तके छपाईची कामे करणारे व्यावसायिक शहर व उपनगरांत विखुरलेले आहेत. लग्नाचा हंगाम या व्यावसायिकांकरिता अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, वार्षिक 5 ते 10 कोटींची उलाढाल असलेल्या या व्यवसायाला करोनामुळे गेल्या वर्षापासून घरघर लागली आहे. त्यातच दुसऱ्या लॉकडाऊनच्या शक्यतेने या व्यवसायात नवा अडसर निर्माण केला आहे.
छापील उत्पादनांचा वापर करोनाकाळात एकदमच थंडावला. त्याचा थेट फटका प्रिंटिंग व्यवसायाला बसला आहे. लग्नपत्रिकांच्या छपाईची मागणी थेट 50 टक्क्यांवर आली आहे. सध्या डिजिटल प्रकारातून व्हॉट्सऍप, फेसबुकच्या माध्यमातून लग्नपत्रिका व हॅण्डबिल पाठविण्यावर भर दिला जात असल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कामे मिळत आहेत. लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, प्रचार साहित्य यांचीही मागणी कमी झाल्याचे हे व्यावसायिक सांगतात. शहरात 150 लहान छपाईची दुकाने तर पॅकेजिंग आणि मोठी छपाईच्या सात ते आठ आस्थापना शहरात आहेत. त्या सर्वावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गालाही मोठा फटका बसला आहे. अनेक कामगार कमी करावे लागले आहेत.
लॉकडाऊनच्या शक्यतेने हवालदिल
गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात करण्यात आलेली लग्नपत्रिका, प्रचार साहित्याची मागणी ग्राहकांनी निम्म्यावर करण्यास सांगितली आहे. त्यामुळे आता कुठे उभारी घेऊ लागलेल्या व्यवसायाला पुन्हा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.
कच्चा माल महागला
कागद, छपाईचे रंग आणि साचे बनवण्याचा कच्चा माल महागल्याने छपाईच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र करोनाच्या काळात व्यवसाय टिकवण्यासाठी ग्राहकांवर खर्चाचा भार टाकल्यास नुकसान होण्याची भीती असल्याने नफा कमी करत व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे अनेक व्यावसायिक सांगतात. छपाई साहित्याची सजावट आणि डिझायनर यांच्या व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.