मुंबई : जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन, ठाणे व गुप्तवार्ता विभाग, मुंबई यांचे संयुक्त पथकाने दि 28 जुलै, रोजी मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या गोदामावर छापा घालून ओलेना (1000 मिलीग्रॅम विटॅमिन सी) टॅब्लेट्स तसेच मे. साई प्रो बायोटेक प्रा. लि., ता. मुळशी, जि. पुणे यांचेमार्फत उत्पादित कार्डीओ या अन्नपदार्थाचा साठा कारवाई करून जप्त केला आहे.
ओलेना टॅब्लेट्सच्या वेष्टनावर विटॅमिन सी 1000 मिलीग्रॅम असा मजकूर छापला आहे. प्रत्यक्षात ही मर्यादा आयसीएमआरच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आयसीएमआरनुसार विटॅमिन सी ची मर्यादा ही केवळ 40 मिलीग्रॅम असणे बंधनकारक आहे.
हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही कारवाई ही कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, अन्न सुरक्षा आयुक्त, यांनी दिलेल्या निर्देशानुसार व सह आयुक्त (गुप्तवार्ता), सह आयुक्त (को.वि), अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.