रावणगाव -खडकी (ता. दौंड) येथे अवैध ताडी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर बारामती गुन्हे शाखेने अचानक छापा टाकून बनावट ताडी आणि ती बनविणाऱ्यास मुद्देमालासह अटक केली आहे.
बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी बारामती गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या खडकी येथे बारामती गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता या ठिकाणी दुर्गेश श्रीशैल भंडारी (रा.खडकी, ता. दौंड) हा व्यक्ती क्लोरल हायड्रेट, सक्रीन आणि कृत्रीम रंग पावडर यांचा वापर करून बनावट ताडी तयार करून ती खरी ताडी असल्याचे भासवून विक्री करत असताना मिळून आला.
यावेळी त्याच्या कडून 2 हजार 930 रुपये रोख, 40 लिटर बनावट ताडी, क्लोरल हायड्रेट, सक्रीन आणि कृत्रीम रंग पावडर असा 5 हजार 895 रुपये चा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर दौंड पोलीसात फसवणुक व दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे तसेच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान के. बी. शिंदे, संजय चांदणे, अरूण राऊत यांनी केली.