आत्महत्येचा प्रयत्न करणारा मुख्याध्यापकच निलंबित

शंकर दुपारगुडे
झेडपीच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर मेहरनजर

कोपरगाव – प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकाला न्याय मिळण्याऐवजी शिक्षा केल्याचा प्रताप जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे. या शिक्षण विभागाच्या या अजब कारभारामुळे कोपरगाव तालुक्‍यातील शिक्षक चांगलेच संप्तत झाले आहे. टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे यांना निलंबित करण्यात आले असून ज्या प्रभारी शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी त्रास दिला. त्यांची मात्र जुजबी चौकशी करून त्यांच्यावर मेहरनजर दाखविण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्‍यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तत्कालिन मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे यांनी प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांच्या जाचाला कंटाळून शाळेच्या कार्यालयात गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न दि. 30 जुलै 2019 रोजी सकाळी 10 च्या सुमारास केला होता. प्रसंगावधान ओळखुन त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचविले. ही गंभीर घटना घडल्यानंतर काही वेळातच शबाना शेख घटनास्थळी येवून काही घटना न झाल्यासारखे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शिक्षक संघटना, स्थानिक कार्यकर्त्यांनी शबाना शेख यांच्या विरोधात आवाज उठवुन त्यांच्या विरोधात आंदोलने केली.

शबाना शेख यांनी तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांना मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अशा त्रास देणाऱ्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचे निलंबन करावे, म्हणुन तालुक्‍यासह जिल्ह्यातील शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. शिक्षण विभागात चिघळलेले वातावरण निवळण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने संबंधितांवर योग्य कारवाई करून शिक्षकांवर होणारा अन्याय थांबविण्याचे आश्‍वासन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर संबधित प्रकरणाबद्दल विशेष समिती स्थापन करून चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले.

अखेर ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सोनवणे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई करून शबाना शेख यांची जुजबी चौकशी करून त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. जिल्हा परिषदेच्या या अजब निर्णयाने जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ज्याला न्याय द्यायला हवा होता. त्यांच्यावर कारवाई करून न्यायाचा नवीन फंडा निर्माण केला. अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.

शबाना शेख यांच्या कार्यशैलीवर गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्‍यातील शेकडो शिक्षक नाराज आहेत.अनेक वेळा त्यांनी आपल्यापदाचा गैरवापर करून शिक्षकांवर कायद्याचा बडगा दाखवत मानसीक त्रास दिल्याची चर्चा शिक्षक संघटनेच्या निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

तालुक्‍यातील जवळपास 650 शिक्षकांनी आपल्या सह्यांचे निवेदन शिक्षण विभागाला दिले. शेख यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या जुलमी कार्याचे पुरावे त्या निवेदनासोबत जोडले आहेत.इतक्‍या मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा आक्रोष शबाना शेख यांच्या विरोधात असतांना शेख यांच्यावर अजुनही ठोस कारवाई केली नाही. मात्र शेख यांच्या वर्तनाला कंटाळुन आपले जीवन संपवणाऱ्या मुख्याध्यापकाला वरिष्ठांनी निलंबनाची कारवाई करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

दरम्यान, सोनवणे यांच्यावर बुधवारी शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली. शबाना शेख यांच्या कोणतीच कारवाई झाली नाही. उलट त्या प्रकरणापासुन सुटका झाल्याने त्यांना सुट्ट्यावर सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, अशी चर्चा शिक्षकांमधुन केली जात आहे. तालुक्‍यातील मुर्शपुर जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने मुलींना लैगिंक शिक्षणाचे धडे अघोरी पद्धतीने देवुन खळबळ माजवली होती. तेव्हा त्या शिक्षकाला काही पालकांनी चांगला चोप दिला होता. ते प्रकरण प्रसारमाध्यमापुढे येवु नये, याची विशेष खबरदारी शिक्षण विभागाने घेतली होती.

मात्र दैनिक “प्रभात’ने त्याला वाचा फोडली. संपुर्ण प्रकरण उजेडात आले. तेव्हा शबाना शेख यांनी त्या शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी या प्रकरणाची माहिती शिक्षण विभागाला वेळेत का कळवली नाही, असे कारण पुढे करून लैंगिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला धडा शिकविण्याऐवजी त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करून अजब न्याय दिला. शिक्षण विभागात सुरू असलेल्या अशा या अजब न्याय व्यवस्थेमुळे तालुक्‍यातील शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)