मुंबई : काही दिवसांपुर्वी केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर या बाळाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आहे. आज अखेर प्रिन्सचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारपासूनच प्रिन्सची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मध्यरात्री अडीच्या सुमारास प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात चिमुकल्याचा जीव गेला.
प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील परळ मधील केईएम रुग्णालयात आणले होते. तिथे प्रिन्सला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता आणि आग लागली त्यामुळे प्रिन्सची डावी बाजू भाजली होती.
7 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. 11 नोव्हेंबरला प्रिन्सवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रिन्सला डावा हात गमवाला लागला होता. गेल्या दोन आठवड्यापासून प्रिन्सची प्रकृती नाजूक असल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने प्रिन्सची प्राणज्योत मालवली.