पुणे – राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असतानाच उद्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत असून पंतप्रधान काय बोलणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीसाठीही मोदी यांची पुण्यात सभा झाली होती. या सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्यामुळे, ते आज पुण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, टिळक रस्त्यावरील स. प महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर आणि पुण्यात सभा होणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ५८ विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये मोदींच्या सभेमुळे सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल. या सभेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असल्याचे मोहोळ म्हणाले.
कोणावर साधणार निशाणा?
महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी आपले जाहीरनामे जनतेपुढे मांडले असून त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर, राज्यातील प्रचारात उतरलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंग़े तो कटेंग़े’ असा नारा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक हे तो सेफ है’ असे सांगत हिंदूत्वाला साद घातली आहे. त्यावर महाविकास आघाडीकडून टिकेची झोड उठवण्यात आली असून पंतप्रधान पुण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.