धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्यांचा बीमोड झाला – पंतप्रधानांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय ही आजची विश्वातील सर्वात मोठी घटना आहे. भारतातील जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी व्यक्‍त केली आहे. भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातल्या विजयोत्सवामधील भाषणात मोदी बोलत होते.

या विजयामुळे पुर्ण जगाला भारताच्या लोकशाहीला चांगल्या पध्दतीने ओळखता येईल. हा विजय देशातील 130 कोटी जनतेच्या चरणी अर्पण आहे. या लोकसभा निवडणुकीत कोणताही पक्ष धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरू शकला नाही. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्यांचा बीमोड झाला.

कोणताही पक्ष माझ्या आणि भाजपविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकला नाही. ही निवडणूक जनतेने लढवली.या निवडणुकीने देशासमोर एक उदाहरण ठेवले आहे. या देशात आता ‘गरीब’ आणि दुसरी जात ‘गरिबीपासून मुक्त करू इच्छिणारी’ या केवळ 2 जाती राहतील. याव्यतिरिक्त जातींचा वापर करणाऱ्यांचे भांडवल काढून घेतले आहे.

इतका मोठा विजय मिळाल्यानंतरही नम्रतेने पुढे जायचे आहे. संविधानाला प्रमाण मानून चालणार आहोत. देशाने आम्हाला खूप काही दिले आहे. तुम्ही या फकिराची झोळी तर भरलीत. तुमच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा यात सामावलेल्या आहेत. जसा विश्वास वाढतो, तशा जबाबदाऱ्याही अधिक वाढतात. काम करताना माझ्याकडून चूक होऊ शकते. मात्र, मी कोणाचे जाणीवपूर्वक कोणाचे वाईट करणार नाही. मी माझ्या स्वतःसाठी काही करणार नाही, याचीही खात्री देतो, असे पंतप्रधान म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here