‘करोनाची तिसरी लाट काही…’ नियमांच्या चिंधड्या उडवणाऱ्यांना पंतप्रधानांच्या कानपिचक्‍या

नवी दिल्ली – करोनाचा विषाणू बहुरूपी आहे. तो वारंवार आपले स्वरूप बदलतो आहे. त्यामुळे त्याच्या व्हेरिएंटकडे आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. त्याचे बदलणारे रूपच आपल्यापुढे आव्हान निर्माण करते आहे. हे नवे रूप किती त्रासदायक असेल त्याचा संशोधक मंडळी अभ्यास करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशात दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागल्यानंतर पर्यटन स्थळांवरची गर्दी वाढू लागली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील हिल स्टेशन्सवर तर पर्यटकांनी करोनाच्या नियमावलीच्या चिंधड्या उडवत सगळीकडे एकच गर्दी केली होती. 

त्यामुळे मसूरी, मनाली, नैनिताल, शिमला अशा सगळ्याच ठिकाणी हाउसफुलचे बोर्ड लागलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोकाही वाढला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सावधानतेचा इशाराही दिला जातो आहे. मात्र ही गर्दी पाहून पंतप्रधानही चिंतीत झाले असून त्यांनी लोकांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

तिसऱ्या लाटेची चर्चा करताना सरकारची काय तयारी आहे, असे प्रश्‍न विचारले जात असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, तिसरी लाट आल्यावर तुम्ही काय करणार असे विचारले जाते. मात्र तिसऱ्या लाटेचा विचारच मनात येण्यापासून रोखण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार व्हायला हवा. करोना ही अशी गोष्ट आहे की ती स्वत:हून येत नाही. कोणीतरी जाउन आणल्यावरच ती येते. त्यामुळे आपण काळजी घेतली आणि त्यानुसार वागलो तर तिसरी लाट रोखू शकतो. 

तिसरी लाट रोखणे मोठे काम आहे. मात्र नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. मास्क न घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे, तिथे कोणतीही खबरदारी न घेणे या गोष्टी अत्यंत चिंतेचा विषय आहेत. तिसरी लाट येण्याच्या अगोदर आम्हाला एन्जॉय करायचा आहे असे काही लोक छातीठोकपणे म्हणत आहेत. मात्र त्यांनी प्रथम हे समजून घेतले पाहिजे की तिसरी लाट काही आपोआप येणार नाही, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.