प्रचारगीतामध्ये पंतप्रधान रणगाड्यावर आरूढ 

– कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

मुंबई- भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या “मै भी चौकिदार हुँ’ या गाण्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या प्रचार गीतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर आरूढ होऊन केलेले चित्रीकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी यांनी केली आहे.

मल्लाणी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मागील दोन दिवस सोशल मीडियावर “मै भी चौकीदार हुँ’ हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे गाणे ट्‌वीट केले आहे. या गाण्यात नरेंद्र मोदी रणगाडयावर बसलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे या चित्रफितीमध्ये भारतीय लष्कराचे जवान लढताना देखील दाखवण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 9 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार राजकीय पक्षांना प्रचारामध्ये भारतीय लष्कर आणि संबंधित प्रतिकात्मक छायाचित्रांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या पश्‍चातही “मै भी चौकिदार हुँ’ या गाण्यामध्ये पंतप्रधानांना रणगाड्यासमवेत दाखवून भाजपने निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात भाजपवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही तौफिक मुल्लाणी यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारी, दहशतवादी हल्ले असे अनेक गंभीर प्रश्न सोडविण्यात साफ अपयशी ठरलेले हे सरकार अशा जाहिरातींच्या माध्यमातून भारतीय लष्कराचे श्रेय लाटण्याचा निंदनीय प्रकार करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)