जेरुसलेम – इस्राएलमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांनी केला आहे. सोमवारी मतदान संपल्यानंतर नेतान्याहू यांच्या उजव्या विचारसरणीचा पक्ष किमान 59 जागा जिंकू शकेल, असा अंदाज एग्जिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाले तर इस्रायलच्या 120 सदस्यांच्या संसदेत नेतान्याहू यांच्या पक्षाला बहुमतासाठी केवळ दोनच जागा कमी असतील.
दरम्यान, गेल्या एप्रिल आणि सप्टेंबरमधे झालेल्या निवडणुका अनिर्णित राहिल्याने वर्षभरात तिसऱ्यांदा इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांनंतर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आघाडी सरकार स्थापन करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र समविचाराच्या पक्षांची आघाडी स्थापन होऊ शकली नव्हती.
देशात प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहिलेले नेतान्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीतील निकालावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.