थिरूवनंतपूरम –पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केरळचा दौरा करणार आहेत. त्यावेळी ते वायनाडमधील भूस्खलनाने तडाखा दिलेल्या भागांची पाहणी करतील. मोदींच्या दौऱ्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी दिली. भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय मदत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मोदी सकारात्मक भूमिका घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
वायनाडमधील स्थितीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे, अशी मागणी केरळ सरकार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, केरळ दौऱ्यात मोदी कुठली घोषणा करणार का याविषयी उत्सुकता असेल. वायनाडमधील भूस्खलनात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. अजूनही १३१ जण बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठीची मोहीम सुरूच आहे.